१९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द शेतकरी आंदोलक व अभ्यासक अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजासाठी अन्नत्याग आंदोलन होणार आहे.मागील काही वर्षापासून अमर हबीब नावाचा शेतकऱ्यांच्या प्रती तळमळ असलेला समाजसेवक शेतकऱ्यांचे प्रश्न,समस्या,अडचणी सरकारपर्यंत पोहचाव्यात यासाठी धडपड करीत आहे.त्यासाठी अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते, नेते, पञकार, कलाकार, प्रबोधनकार, विचारवंत, लेखक यांना अन्नत्याग आंदोलनाचे गांभीर्य पटवून देत आहे. १९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान या गावातील शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी व ४ मुलांसह आत्महत्या केली होती.ही या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या होय. तेव्हापासून देशात आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे व अजूनही त्या सुरुच आहेत.
शेतकरी आत्महत्येचे हे भीषण वास्तव व सध्यस्थितीत शेतकऱ्यांची असलेली बिकट अवस्था या देशातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचावी व त्यातून या प्रश्नावर काहीतरी योग्य तोडगा निघावा या उदात्त हेतूने अमर हबीब यांनी या आंदोलनाची धुरा आपल्या सहका-यांना सोबत घेवून खांद्यावर घेतली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे आणि प्रत्येकच सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हे शेती व शेतक-यांंच्या -हासाला कारणीभूत ठरत आहे असे विश्लेषण अमर हबीब व शेतकरी आंदोलनातील सर्वच नेतेमंडळी वेळोवेळी करीत असतात. प्रत्येकाच्या मांडणीमधे थोडाफार अंतर्विरोध असू शकतो. परंतु शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाहण्याची सगळ्यांची भावना माञ प्रामाणिक व तळमळीची आहे.
स्मृतीशेष साहेबराव करपे हे प्रामाणिक व गावात अतिशय आदर व सन्मान असलेले शेतकरी होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे पाईक होते. राष्ट्रसंतांनी ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण करुन त्याच्या कष्टावर मजा भोगणारे कोण आहे हे स्पष्टपणे नोंदवून ठेवले आहे. जोपर्यंत या देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळणार नाही व धर्माच्या नावावर ऐतखाऊंचे लाड बंद होणार नाही, तोपर्यंत शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब माणूस आनंदी होवू शकणार नाही हे महात्मा जोतीराव फुले यांनी सुध्दा शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात लिहून ठेवले आहे. साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली नसून ते या देशातील विषमतावादी व भांडवलवादी व्यवस्थेचे बळी ठरले आहेत.

प्रेमकुमार बोके अंजनगाव सुर्जी – राज्य वक्ता संभाजी ब्रिगेड
काही वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातच राजूर गावातील शेतकरी सुधाकर येडे यांनी आत्महत्या केली होती. त्यांची विधवा पत्नी वैशाली येडे यांनी यवतमाळ अ.भा.मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलतांना, मी एकटी विधवा झाली नसून हा संपूर्ण समाजच विधवा झाला आहे असे वेदनादायी व आपल्याच विश्वात रममाण असलेल्या आपमतलबी समाजाला चिंतन करायला लावणारे विधान केले होते. साहेबराव करपे-सुधाकर येडे-धर्मा पाटील ही श्रृंखला अजूनही थांबली नसून ३४ वर्षातही परिस्थिती अजिबात बदलली नसून उलट ती जास्त बिघडली आहे. सामान्य परिस्थिती असलेला आमदार-खासदार जेव्हा ५ वर्षात करोडपती-अब्जोपती बनतो, तेव्हा ही लोकशाहीप्रधान व्यवस्था कोणासाठी व कशासाठी काम करते यावर फार डोके चालविण्याची गरज नसते. शेतकऱ्यांच्या व श्रमकऱ्यांच्या प्रेतावर आपली पोळी भाजणारे लोकप्रतिनिधी ज्या देशात जन्माला येतात, तो देश अजूनही एक हजार वर्षे महासत्ता बनू शकत नाही हे वाक्य सर्वांनी आपल्या काळजावर कोरून ठेवावे. ज्या देशातील जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी सामान्य जनतेचा विचार करण्याऐवजी जनतेचे शोषण करणाऱ्यांच्या बाजूने आणि बाहूत असतात, त्या देशाला बुडविण्यासाठी कोणत्याही बाह्य शञूंची गरज नसते हे महात्मा फुलेंनी १८८५ मधेच पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंञण नाकारतांना अध्यक्ष न्या.महादेव गोविंद रानडे यांना लिहिलेल्या पञात स्पष्टपणे सांगितले आहे.
स्मृतीशेष साहेबराव करपे ३४ वर्षापूर्वी कुटुंबियासोबत जग सोडून गेले.३ वेळा अविरोध सरपंच म्हणून निवडून आलेला माणूस निश्चितच वाईट,व्यसनी आणि व्यभिचारी नसेल हे सांगण्याची गरज नाही. ते स्वाभिमान आणि इमानदारीने स्वकष्टावर जीवन जगणारे करारी व्यक्ती होते.म्हणूनच व्यवस्थेकडून झालेला अपमान जिव्हारी लागून त्यांनी आत्महत्या केली.आत्महत्या करणे पाप आहे हे सर्वच विद्वान सांगतात व ते योग्यही आहे आणि आत्महत्येचे समर्थन करण्याचे कारणही नाही.परंतु जगण्याचे सर्वच मार्ग जेव्हा व्यवस्था बंद करून टाकते,तेव्हा नाईलाजाने हे टोकाचे पाऊल काही लोकांना उचलावे लागते.आपल्या बलिदानाने तरी सरकारला जाग येवून इतरांचे जगणे सुकर होईल ही त्यामागची अनेकांची समाजशील भावना असते.त्यामुळे भेकाड किंवा दुर्बल म्हणून त्यांची निर्भत्सना करणाऱ्यांनी सर्व बाजूंनी विचार करूनच आपले मत व्यक्त करावे.
८० वर्षाचे शेतकरी धर्मा पाटील यांना हजारदा मंञालयात चकरा मारूनही स्वतःंच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही म्हणून मंञालयात विष प्राशन करून आपली जीवनयाञा संपवावी लागते आणि त्याच मंञालयात मंञ्यांच्या आशिर्वादाने दररोज कोट्यावधीची अनधिकृत कामे अधिकृत होतात ही कसली लोकशाही ? बँकाचे हजारो कोटी रुपये बुडवून अनेक उद्योगपती सरकारच्या सहाय्याने परदेशात फरार होवून मस्त मजा मारतात आणि इकडे अमरावती जिल्ह्यात एका शेतकऱ्याने Axis बँकेचे पूर्ण कर्ज भरुनही,त्याला कोलकता कोर्टाचे अटक वारंट जारी होतात यापेक्षा दुसरी नालायकी अजून कोणती असू शकते ? तरीही आम्हाला या शोषणवादी व्यवस्थेविषयी घृणा वाटत नसेल तर आमच्यातील माणूसपण संपले आहे हे समजून घ्यावे.
आम्ही सर्वच हाडामासाचे माणसे आहोत. त्यामुळे आमच्यामधेही वेदना, संवेदना, प्रेम,दुःख, जिव्हाळा, आपुलकी, कळवळा या भावना आहेतच हे गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे जगाला जगविणाऱ्याच्या दुःखात आपण जर एक माणूस म्हणून सहभागी झालो तर ते खूप मोठे योगदान ठरेल. म्हणूनच इतर उपवासांपेक्षा या उपवासाचे महत्व वेगळे आहे. बळीराजासाठी एक दिवस अन्नत्याग हा आपल्या जीवनातील सर्वोच्च उपवास असेल व त्याचे समाधान शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिल याची ग्वाही देतो. तेव्हा,चला ! सर्वांनी १९ मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग करून थोडेफार समाजऋण फेडू या ही नम्र विनंती.
प्रेमकुमार बोके
अंंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६