किसानपुत्र आंदोलनाने 19 मार्च रोजी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात लाखो किसानपुत्र उपवास करतात. काल पत्रकार परिषद घेतली १९ मार्च अन्नत्याग आंदोलन बाबत माहिती दिली. सध्या कोरोना व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे अशी भिती निर्माण करुन जर सार्वजनिक उपक्रम बाबत बंधन लावत असतील तर ते दुर्दैव म्हणावे लागेल.
१९ मार्च रोजी परिस्थिती बाबत एक दिवस आधी प्रशासन आणि शासन यांच्या नियमानुसार सहकार्य केले जाईल. परंतु १९ मार्च रोजी होणारे अन्नत्याग आंदोलन रद्द मुळीच होणार नाही.
सांयकाळी पुस्तक परिसंवाद असल्याने सरकारी आदेशानुसार लोकांना एकत्र करून कार्यक्रम घेऊ नये असे कळवले आहे. अन्यथा जिथे कार्यक्रम घेणार आहे त्यांच्यावर कार्यवाही होईल असे सांगितलं आहे.
पुस्तक परिसंवाद बाबत आज तरी कार्यक्रम रद्द नाही असे जाहीर करतो. प्रशासनाला सहकार्य करणे नक्कीच नागरिक म्हणून कर्तव्य आहे.
प्रशासनाने देखील पुढील तीन दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेऊन सहकार्य करावे.
रोज शेतकरी आत्महत्या शेतकरी विरोधी कायदे व्हायरस ने होत असले आणि तुम्ही तो व्हायरस थांबू शकत नसाल तर आम्हांला तो थांबवण्यासाठी आंदोलन करावे लागेलच.
शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व संकटात सापडलेल्या शेतकर्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी लाखो किसानपुत्र लाक्षणिक उपवास करणार आहेत. हा उपवास महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून होईल, तसेच देशातील अन्य राज्यात व विदेशातही अनेक किसानपुत्र अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाच्या समन्वय समितीचे मयुर बागुल यांनी दिली.
*पहिली सामूहिक आत्महत्या*
19 मार्च 1986 रोजी चिल-गव्हाण (यवतमाळ जिल्हा) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांची पत्नी मालतीताई व चार अपत्यांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्यांची पहिली सामुहिक आत्महत्या मानली जाते. साहेबराव करपे यांनी मरण्यापुर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी शेतकर्यांच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष वेधले होते. दुर्दैवाने कोणत्याच सरकारने शेतकर्यांच्या बिकट परिस्थितीचा गंभीरपणे विचार केला नाही. साहेबराव करपे यांच्या आत्महत्येनंतर असा एकही दिवस गेला नाही की, ज्या दिवशी शेतकर्याची चिता पेटली नाही. आजपर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुर्दैवाने शेतकर्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. साहेबराव करपे यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त हे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती व शेतकरीविरोधी कायदे संपुष्टात आणणे हा राष्ट्रीय कार्यक्रम मानला पाहिजे असे किसानपुत्र आंदोलनाचे मत आहे.
या आपत्तीला तोंड देण्यासाठी समजाने आणि सरकारने पुढे आले पाहिजे. सरकारने फालतू गोष्टी करण्यात वेळ न घालवता, देशात एकाही शेतकर्याची आत्महत्या होणार नाही व एकाही महिलेवर अत्याचार होणार नाही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व समाजाने शेतकरी आणि स्त्रियांच्या बाजूने आवाज बुलंद केला पाहिजे असे मत मयुर बागुल यांनी व्यक्त केले.
*तीन पर्याय*
1) देवा-धर्मासाठी खूप उपवास केलेत, आता एक उपवास शेतकर्यांसाठी करावा. अशा प्रकारे आपण आपले काम करीत वैयक्तिक उपवास करू शकतो.
2) हे उपोषण कोण्या पक्षाचे वा संघटनेचे नाही. यात कोणतीही संघटना, पक्ष, संस्था, मंडळ सहभागी होऊ शकते. हवे तर एकत्र, वा स्वतंत्रपणे ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी बसूनही उपोषण करू शकता.
3) वैयक्तिक उपवास करणे, सामुहिक उपोषण करणे शक्य नसेल तर (खास करून विद्यार्थी) दोन मिनीटांचे मौन पाळून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
*वाढता प्रतिसाद*
2017 साली साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथून उपवासाची सुरुवात झाली. दुसर्या वर्षी ज्या दत्तपूरला त्यांनी आत्महत्या केली तेथे भेट देऊन पवनार येथे उपोषण केले. तिसर्या वर्षी दिल्लीत म. गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाट येथे केले. या वर्षी अमर हबीब व त्यांचे सहकारी पुण्यात मा. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन बालगंधर्व समोर, राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ उपोषण करणार आहेत.
दरवर्षी उपवास करणार्यांची संख्या वाढत असून महिला मोठ्या संख्येने भाग घेतात अशी माहिती मयुर बागुल यांनी दिली.
*मान्यवरांचा सहभाग-*
यंदा 19 मार्चच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, श्री क्षेत्र परमधाम मठाचे मठाधिपती आदरणीय प.पू.गुरुश्री, सुराज्य सेनेचे नेते प्रा. सुभाष वारे, अंनिसचे कार्यध्यक्ष अविनाश पाटील, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक गिरधर पाटील, भूजलतज्ञ उपेंद्र दादा धोंडे, पत्रकार अविनाश दुधे, लेखक व प्रकाशक घनश्याम पाटील मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, गजल नवाज भीमराव पांचाळे, चित्रपट कलावंत व आम आदमी पार्टीचे प्रवक्ता संदीप मेहता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव मा. प्रमोद पाटील, स्वर्ण भारत पक्षाचे संजय सोनवणी, लोकजागर पार्टीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर, आदींचा समावेश आहे.
१९ मार्च रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत बालगंधर्व समोर, राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे पुण्यातील किसानपुत्र जमतील. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब, अनंत देशपांडे, डॉ. राजीव बसरगेकर, महेश गजेंद्रगडकर, मयुर बागुल, नितीन राठोड, सतिश देशमुख, प्रशांत शिनगारे, राम शेप, अमित सिंग, अरुण यावलीकर व इतर किसानपुत्र व किसानपुत्री एक दिवस अन्नत्याग उपोषण करण्यासाठी जमणार आहेत. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी आपल्या शेतकरी बापासाठी एक दिवस अन्नत्याग, उपोषण करण्यासाठी आवर्जून यावे असे आव्हान किसानपुत्र आंदोलन करत आहे.
सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी फाउंडेशन येथे, जेष्ठ पत्रकार दीप्ती राउत लिखित ‘कोरडी शेतं ओले डोळे’ या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण पुस्तकावर परिसंवाद होऊन उपोषण सोडण्यात येईल. या परिसंवादात अमर हबीब (किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, आंबाजोगाई), गजानन अमदाबादकर (शेतकरी आत्महत्या झालेल्या विदर्भातील सुमारे ५ हजार कुटुंबास प्रत्यक्ष भेट दिलेले शेतकरी आंदोलक, वाशिम), रमेश जाधव, (शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक व पत्रकार, पुणे), दीप्ती राऊत, (लेखिका व पत्रकार, नाशिक) हे भाग घेणार आहे.
——-
१९ मार्च २०२० अन्नत्याग, पुणे
सकाळी ९ वाजता – महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन
स्थळ- फुलेवाडा, गंजपेठ, पुणे
सकाळी १० ते ४ – अन्नत्याग-उपोषण
स्थळ- बालगंधर्व समोर, जंगली महाराज रोड, पुणे.
सायंकाळी ५ ते ७ – उपोषणाची सांगता
दीप्ती राऊत लिखित ‘कोरडी शेतं ओले डोळे’ या पुस्तकावर परिसंवाद.
सहभाग- अमर हबीब, (किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, आंबाजोगाई)
गजानन अमदाबादकर, (शेतकरी आत्महत्या झालेल्या विदर्भातील सुमारे ५ हजार कुटुंबास प्रत्यक्ष भेट दिलेले शेतकरी आंदोलक, वाशिम)
रमेश जाधव, (शेतकरी प्रशनाचे अभ्यासक व पत्रकार, पुणे)
दीप्ती राऊत, (लेखिका व पत्रकार, नाशिक)
स्थळ- एस एम जोशी फाउंडेशन, गांजवे चौक, पुणे.
मयुर बाळकृष्ण बागुल
किसानपुत्र आंदोलन, पुणे
मो. ९०९६२१०६६९