ध्यानस्त साधकांच्या ध्यानात हाव आता
शब्दांत मौन त्यांच्या कृत्यात घाव आता
शंका मुळीच नाही, होतील तेच नेते
ओठात हास्य ज्यांच्या, पोटात डाव आता
हा वाढला महाली जोहार गारद्यांचा
वस्तीत झोपडयांचा नाही निभाव आता
माझाच बाप मजला तेंव्हा पुसुन गेला
फाशीस काय मिळतो सांगा भाव आता
किरणकुमार मडावी, (मु.पो.अंतरगाव ता. कळंब जि. यवतमाळ) या नवोदित गझलकाराच्या वरील गझलेतील ‘फाशीस काय मिळतो सांगा भाव आता..’ हा शेर वाचला आणि अंगावर क्षणभर सरसरुन काटा उभा राहिला. यावरुनच शेतक-यांची अवस्था, आत्महत्याकांडासारखे रिपोर्ट, शेतक-यांना काय मिळाले, आणि काय मिळाले पाहिजे याचे मंथन करण्यापेक्षा हा नुसता शेर जरी वाचला तरी शेतकरी बांधवांची झालेली दारुण अवस्थेची कल्पना डोळ्यांसमोर तरळून जाते.
देशभरातील शेतक-यांच्या दिवसेंनदिवस होत असलेल्या आत्महत्यांनी देशातील संवेदनशील माणसे हादरुन जात आहेत परंतु सरकार आणि समाजाला याचे कसलेच सोईरसुतक राहिलेले दिसत नाही.
19 मार्च 1986 ही तारीख चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येचा स्मृतीदिन. तो गेल्या चार वर्षापासून साजरा केला जात आहे. 34 वर्ष झाली तरीही शेतक-यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकलो नाहीत, ही मोठी सामाजिक शोकांतिका म्हणावी लागेल. दररोज 40 ते 45 शेतकरी आपले मौल्यवान जीवन संपवित आहेत. दरवर्षी शेतक-यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढतच चालला आहे. यात आपला महाराष्ट् आघाडीवर आहे.
शेतीवर जगणे दुरापास्त, नापिकी, जाचक अटी, कायदे, शेतक-यांचे हक्क हिरावून घेवून गुलामीतले जगणे, यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या ही त्याचीच परिणीती असताना दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसते आहे.
19 मार्च रोजी आत्महत्या केलेल्या सर्व शेतक-यांचे स्मरण म्हणून शेतक-यांच्या स्वातंत्रयासाठी, शेतक-यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन केले जाते आहे. किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी सुरु केलेले हे अन्नत्याग आंदोलन का व कशासाठी ? याचा इतिहास ऐकला की संवेदनशील माणसांच्या अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. साहेबराव करपे हे माळकरी व संवेदनशील शेतकरी म्हणून परिचित होते. 19 मार्च 1986 या दिवशी आपल्या पत्नी व चार लहान मुलांसह पवनारला विनोबा भावे यांच्या आश्रमात गेले. तिथे तल्लीन होवून भजन गायले. आणि भजन संपल्यानंतर रात्री दत्तपूरयला आश्रमात मुक्कामी येवून जेवनातून आधी चार मुलांसह पत्नीला व त्यानंतर आपण जेवनातून विष खायला घालून आत्महत्या केली. व चारही लेकरांच्या कपाळावर नाणे देखील चिटकवले. त्यानंतर सुसाईड नोट मध्ये ‘शेतक-यांची अवस्था खूप बिकट आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे’, असे लिहिलेले आढळले. शिवाय दरवाज्यावर चिटकवलेल्या चिठ्ठीत आधी ‘पोलीसांना कळवा आणि मगच दरवाजा उघडा’ असे लिहिलेले आढळले होते.
हे सारं करण्यामागे कारण काय ? तर शेतात गव्हाचे डोळेभरुन आलेले पिक पाण्याच्या दोन तीन पाळीत आणखी बहारदार होणार होते. परंतु विज मंडळाने थकीत बिलापोटी लाईटचे कनेक्शन कट करुन टाकल्यामुळे हातात आलेले हे पिक सारे करपून राख होणार आणि अतोनात नुकसान होणार या विवंचनेमुळे कुटुंबासह आत्महत्येचा मार्ग साहेबराव करपे यांनी पत्करला व याची यंत्रणेने सहकुटुंब आत्महत्या म्हणून नोंद घेतली. त्यानंतरही सातत्याने शेतक-यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या आपण थांबवू शकलो नाहीत, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. या घटनेवरुनच दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग ही संकल्पना उदयास आली.
19 मार्च अन्नत्याग आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी साहेबराव करपे यांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येकडे संवेदनशीलपणे पाहात या आंदोलनातून सामाजिक जागरुकता निर्माण व्हावी, रोज होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या थांबाव्यात, शेतकरी विरोधी धोरण बदलली जावीत, शेतकरीविरोधी कायदे रद्द केले जावेत म्हणून गेल्या चार वर्षापासून अमर हबीब व अन्नत्याग आंदोलनाचे हजारो कार्यकर्ते सक्रियपणे कार्य करताना दिसत आहेत. स्वतः अमर हबीब यांनी 2017 मध्ये चिलगव्हाण (जि. यवतमाळ), 2018 मध्ये पवनार, 2019 मध्ये दिल्लीतील राजघाटावर तर येत्या 19 मार्चला पुण्यातील म. फुल्यांच्या वाडयाला भेट देवून राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहेत. दरवर्षी उपवास व अन्नत्याग आंदोलन करणा-यांची संख्या दिवसेंनदिवस वाढतच चालली आहे.
यंदाच्या 19 मार्चला अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यातप्रामुख्याने अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वराज्य संघटनेचे प्रा. सुभाष वारे, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, गजलनवाज भीमराव पांचाळे, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक व इतर संवेदनशील व्यक्तींचा यात समावेश राहणार आहे.
शेतकरी आत्महत्या हा एकटया शेतक-यांचा प्रश्न राहिलेला नाही. तो एक प्रत्येकांसाठी संवेदनशील विषय झाला पाहिजे. म्हणूनच 19 मार्चला शेतकरी आत्महत्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा अन्नत्याग करुन आपण सर्वांनी एकतेचे दर्शन घडवून आणले पाहिजे.
●
बाळासाहेब जोगदंड
औरंगाबाद
संवाद – 9423051246